मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती भगवा घेतला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी रामटेकमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे असणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृपाल तुमाने आणि आशिष जैस्वाल उपस्थिती होते. यावेळी बोलताना राजू पारवे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले, तसेच त्यांच्या नेतृत्वात आता मी काम करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
राजू पारवे शिंदे गटाकडून लोकसभेचे उमेदवार
राजू पारवे आता शिंदे गटाकडून रामटेक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून रामटेकच्या या जागेवरून महायुती रस्सीखेच सुरु आहे. शिंदे गटानेदेखील रामटेकवर दावा केला होता. रामटेकमधील विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याबद्दल अहवाल चांगला नाही. पर्यायी उमेदवार शोधा, असं भाजपने एकनाथ शिंदेंना कळवलं होतं. त्यानुसार पारवे हेच आता शिंदेंकडून रामटेकमधून उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.