मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनामागे शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचा हात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता. याला मंगळवारी राजेश टोपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी आपला कोणताही संबंध नाही. यामध्ये एक टक्का तरी मी दोषी असेल तर राजकारणातून संन्यास घेईन, असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते विधानभवनात माध्यमांशी बोलत होते.
आमदार राजेश टोपे म्हणाले, तिथे समाजातील लोकांना नाष्टा देणे किंवा राहण्याची व्यवस्था आम्ही माणूस म्हणून केली. जरांगे पाटील यांचे आंदोलन आजचे नाही. ते अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला मराठा समाजाचा पाठिंबा आहे.
पुढे बोलताना राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, अशा प्रश्नांवर एसआयटी लावली पाहिजे का? असा प्रश्न मला पडला आहे. आंतरवली सराटी येथे ज्यावेळी लाठीचार्ज झाला, त्यावेळी मी तिथे गेलो होतो. मात्र, जे लोक जखमी झाले आहेत, त्यांची काळजी घेण्यासाठी गेलो होतो. माझा तिथे जाण्याचा कोणताही दुसरा हेतू नव्हता. चौकशी झाली तरी हरकत नाही. दुध का दुध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे. माझी काम करण्याची पद्धत जनतेला माहिती आहे, असेही टोपे यांनी सांगितले.