मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी अजित पवार यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. जेष्ठ नेते शरद पवार, आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राजेंद्र शिंगणे यांनी जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य हे देखील उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंगणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. शिंगणे यांच्या पक्षप्रवेशामुळे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलले आहे. शिंगणे यांचा पुनश्च: शरद पवार गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी शरद पवारांना सवाल केला आहे.
शरद पवार साहेब…! निष्ठावंतांचं काय…? असा सवाल करत गायत्री शिंगणे यांनी सिंदखेडराजा मतदार संघातून अपक्ष लढणारच असल्याचा दावा देखील केला आहे. कालच मी शरद पवार साहेबांची वाय बी सेंटर येथे भेट घेतली असता त्या ठिकाणी डॉक्टर शिंगणे यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार असल्याचा कुठेही सुतवाच नव्हता. मात्र, आज त्यांचा प्रवेश झालेला आहे. हरकत नाही मी सिंदखेडराजा मतदारसंघातून अपक्ष लढणारच असा दावा गायत्री शिंगणे यांनी केला आहे.