मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवतीर्थावर आज गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्यभरातून हजारो मनसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आपण लोकसभेसाठी महायुतीला पाठिंबा देत आहोत हे स्पष्ट केलं. यंदाची निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपण लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा देत आहोत असं जाहीर केलं.
तसेच राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सपोर्ट का करत आहे. यामागचं कारण देखील सांगितले. ते म्हणाले, या देशामध्ये राज ठाकरे पहिला माणूस होता जो म्हणाला होता की मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे. त्यांच्या पक्षातील कोणीच तोपर्यंत असे बोलले नव्हते. आपला एक स्वत:चा विचार असतो. त्यात माणसं बोलत असतात, स्वप्न सांगत असतात. प्रत्येकाला वाटते स्वप्न सत्यात उतरावे.
२०१४ च्या निवडणुकीआधी मी मोदींची अनेक भाषणं ऐकली. पण २०१४ ची निवडणूक झाल्यानंतर मला असे वाटले की, मी जे ऐकत होतो ते मला ५ वर्षांत दिसत नाही. काही तरी वेगळ्याच गोष्टी दिसतात. नोटाबंदी काय दिसते, बुलेट ट्रेन काय दिसते. मी अजूनही सांगतो ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्या पटलेल्या नाहीत.
यासोबतच राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जी गोष्टी योग्य ती योग्य. जी गोष्ट अयोग्य ती अयोग्य, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.