मुंबई : नजिकच्या काळात राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होऊ शकतात. असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्यांवर चर्चा केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत आम्ही शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्याच्या टप्प्यात तो अपयशी झाला आहे. त्यानंतर आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं भवितव्य काय? यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, याबद्दल मी काही बोललो तर तुम्ही म्हणाल की मी खूप मोठं वक्तव्य केलं आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मला कुठेतरी असं जाणवू लागलं आहे, की नजिकच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होतील. सध्या तसं चित्र दिसू लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या तांत्रिकदृष्ट्या मुख्य नेतेपद निर्माण करण्यात आलं आहे.
म्हणूनच मी म्हणेन की लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केली जाईल. राज ठाकरे हे त्या शिवसेनेचे प्रमुख होतील. मला तशी शक्यता दिसत आहे. मला स्वतःलाही त्याबद्दल थोडी उत्सुकता आहे, असं प्रकाशआंबेडकर म्हणाले.
मोदींनी उद्धव ठाकरेंना गाजर दाखवलं
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, भाजपाने या निवडणुकीत जी योजना आखली आहे, त्याकडे आपण थोडं गांभीर्याने बघितलं पाहिजे, असं मला वाटतं. मी स्वतः देखील त्याकडे बगतोय. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंबाबत थोडी मवाळ भूमिका घेतली आहे. ते म्हणाले आहेत, उद्धव ठाकरेंची परिस्थिती वाईट झाली तर आम्ही त्यांना मदत करू. म्हणजेच एक प्रकारे मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना गाजर दाखवलं आहे.
दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणि भाजपाच्या प्रचारात आणून मोदी यांनी एक वेगळा प्रयोग केला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच मुख्य नोंदणीकृत शिवसेना राज ठाकरेंकडे देण्याचा घाट घातला नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशा स्थितीत दोन्ही ठाकरे राजकारणात तग धरण्यासाठी संघर्ष करताना दिसतील, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.