मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची कंबर कसली आहे. अशातच आता मनसेला महायुतीमध्ये घेण्याच्या हालचालींना वेग येताना दिसत आहे. आज संध्याकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह सचिन मोरे, हर्षल देशपांडे आणि राज ठाकरे यांचे एक स्नेही हे सर्वजण चार्टड विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे आज रात्री दिल्लीत पोहोचतील.
दरम्यान, आज दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे काहीवेळापूर्वीच दिल्लीला रवाना झाले होते. त्यांच्यापाठोपाठ आज राज ठाकरे दिल्लीकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीत दाखल झाल्यावर राज ठाकरे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे. यावेळी महायुतीच्या कोट्यातून मनसेला एक किंवा दोन जागा सोडल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता दिल्लीत नेमकं काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीत पोहोचले आहेत. पुढील काही दिवसांत भाजपा-मनसेत युती होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप पाहायला मिळणार का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच मनसेच्या महायुतीतील चर्चेवर लवकरच योग्य निर्णय होईल, असं म्हटले होतं, ते आता सत्यात उतरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे हे दिल्लीत पोहचल्यानंतर थेट भाजपच्या मुख्यालयात जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अमित शाह यांची भेट घेऊ शकतात. तसेच राज ठाकरे हे अमित शाह यांच्या निवासस्थानी जाऊन बंद दाराआड चर्चा करु शकतात, असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आता दिल्लीत राज ठाकरे भाजपच्या नेत्यांना भेटल्यानंतर पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.