मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत आज मंगळवारी मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. आता मराठा समाजाला राज्य सरकारकडून देण्यात आलेले हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितले. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “मराठा समाजाने जागृत राहावे. हे तोंडाला पाने पुसण्याचं काम सुरु आहे. देशामध्ये तामिळनाडूत एक प्रकरण झालं होतं की, राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं होतं आणि त्या प्रकरणाची केस अजून सुप्रीम कोर्टात सुरु आहे. याच्यापुढे काही झालं नाही. राज्य सरकारला मुळात याबाबतचे अधिकार आहेत का? ही गोष्ट केंद्राची आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आहे. मी पूर्वीही सांगितले आहे की, हा खूप तांत्रिक विषय आहे. याबाबत नुकतंच सरकारने जाहीर केलं म्हणजे आनंद व्यक्त करण्यासारखं नाही. हे नक्की काय आहे ते एकदा मराठा समाजाने त्यांना विचारावं”, असं राज ठाकरे रोखठोकपणे म्हणाले.
मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं म्हणजे तुम्ही काय दिलं? कशात 10 टक्के आरक्षण दिलं? तुम्हाला तसे अधिकार कुणी दिले? तुम्हाला या गोष्टीचे अधिकार आहेत का? नाहीतर परत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार. मग राज्य सरकार सांगणार प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे. आता आम्ही काही करु शकत नाही. निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या. याला काही अर्थ आहेत का?”, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.