मुंबई : राज्यात काही ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी ऊन आहे. अशा प्रकारच्या हवामान बदलामुळे संसर्गजन्य रोगांसाठी पोषक वातावरण झाले आहे. त्यामुळेच राज्यात पावसाळी आजारांचा प्रदुर्भाव वाढला आहे. राज्यात २६५ दिवसांत मलेरियाचे १३ हजारांहून अधिक, तर डेंग्यू ८ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या दोन आजारांमुळे आतापर्यंत ३४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे मत आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे.
सध्या अनियमित पाऊस तसेच सतत बदलणारे वातावरण यामुळे पावसाळी आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात जानेवारी ते २१ सप्टेंबर या कालावधीत मलेरियाचे एकूण १३ हजार २५० रुग्ण आढळले आहेत, तर १५ जणांचा मृत्यू झाला. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ५ हजार ६०३ रुग्ण आहेत आणि ११ जणांचा मृत्यू झाला.
त्याचप्रमाणे मुंबईत ४ हजार ९२१, नवी मुंबईत ५६८, ठाण्यात ५४१ आणि एक मृत्यू, चंद्रपूरमध्ये ४६८, गोंदियामध्ये ३४९, रायगडमध्ये २८२, पनवेलमध्ये ५०० रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यूचे एकूण ८ हजार ६८६ रुग्ण आढळून आले असून १९ जणांचा मृत्यू झाला. आकडेवारीनुसार, मुंबईत २ हजार ८३५, नाशिकमध्ये १ हजार १०१, कोल्हापुरात ९७८, ठाणे जिल्ह्यात ५७०, पालघरमध्ये ३५०, रायगडमध्ये ३२४, नागपूरमध्ये ३६०, चंद्रपूरमध्ये २९६, गडचिरोलीमध्ये १५०, छत्रपती संभाजी नगरमध्ये ९५, सांगलीमध्ये १६६, अमरावतीमध्ये २३६, लातूरमध्ये १८५, पुण्यात २५१ प्रकरणे आढळून आली आहेत. दुसरीकडे चिकनगुनियामुळे चिंतेचे वातावरण आहे. राज्यात २१ सप्टेंबरपर्यंत एकूण २,१६७ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये नागपुरात ७४१, मुंबईत ३३८, कोल्हापुरात ३८३, पुण्यात ४१९, अमरावतीमध्ये १५६ आणि अकोल्यात १२९ रुग्ण आढळले आहेत.