रायगड : जिल्ह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी झाले आहेत. हा स्फोट एवढा भीषण होता की, या स्फोटाचा आवाज एक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. या झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
साधना नायट्रोकेम कंपनीत हा स्फोट झाला. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा दाखल झालेली आहे. बचाव कार्याला सुरुवात केली आहे. स्फोटाचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या एमआयडीसीमध्ये यापूर्वीही अनेकवेळा कंपन्यांमध्ये आग आणि स्फोटाच्या घटना घडल्या आहेत, असे असुनही इथे काम करणा-या कामगारांच्या सुरक्षेतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.