मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आधारावर आमदार अपात्रतेचा निकाल दिला त्या आधारांच्या मुद्द्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला वकील असीम सरोदे यांनी कायदेशीर बाजू मांडली. सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि राहुल नार्वेकर यांच्या निकालात काय फरक आहे, राहुल नार्वेकर यांच्या निकालात काय चुकलं, याबाबत असीम सरोदे यांनी सविस्तर विश्लेषण केलं.
असीम सरोदे यांच्यानंतर ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी कायदेशीर कागपत्रांचे पुरावे प्रेजेन्टेशनच्या माध्यमातून दाखवले. यावेळी अनिल परब यांनी शिवसेनेच्या 2013च्या प्रतिनिधी सभेचा व्हिडीओच दाखवला. या प्रतिनिधी सभेत स्वत: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उपस्थित होते. यावरुन विधानसभा अध्यक्ष स्वत: त्या बैठकीत होते. बैठकीला असूनही ते कागदपत्र आमच्याकडे आले नाहीत असं ते म्हणाले, असं अनिल परब म्हणाले. त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे.
ठाकरे गटाने प्रतिनिधीच्या सभेचा व्हिडीओ दाखवला. या बैठकीला नार्वेकरही उपस्थित होते. बैठकीत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी ठराव मांडला. त्याला मनोहर जोशी यांनी अनुमोदन दिलं. लिलाधर डाके यांनीसुद्धा अनुमोदन दिलं. माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण करण्याचा ठराव मांडला होता. शिवसेना पक्षप्रमुखपद निर्माण करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील. त्यांना सर्व अधिकार असतील, राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षप्रमुखांची निवड करेल. पाच वर्ष त्यांचा कार्यकाळ असेल, असं रामदास कदम म्हणाले. गजानन कार्तिकर यांनी रामदास कदम यांनी मांडलेल्या ठरावाला अनुमोदन दिलं. हात उंचावून ठराव मंजूर करण्यात आला, असं अनिल परब यांनी सांगितलं.