मुंबई: महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठं यश प्राप्त केल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर मोठा भर दिला आहे. परभणी जिल्ह्यातील माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी आज अजितदादांच्या यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेली असताना बिहारमध्ये आणखी एका नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. राहत कादरी यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
बिहार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राहत कादरी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिहारमध्ये मोठं भगदाड पडलं आहे. एकीकडे नुकत्याच झालेल्या अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार निवडून आल्याने राष्ट्रीय राजकारणात पक्ष वाढीस लागला होता. मात्र, आता शरद पवारांनी कादरी यांना आपल्या पक्षात घेत अजित पवारांना मोठा हादरा दिला आहे.