मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर, मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदातून राणे यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतल्याची चर्चा होती. आता राणे यांची अखेर नाराजी दूर झाली आहे. निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निलेश राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात झालेल्या बैठकीनंतर निलेश राणे यांची नाराजी दूर झाली आहे. या चर्चेनंतर मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, “निलेश राणे यांनी ट्विट केल्यानंतर नेमकं काय घडलं? हे कळत नव्हतं. आम्ही याबाबत नारायण राणे यांच्यासोबत बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. संघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, ही सर्व नेत्यांची भावना आहे.”
एकदम छोट्या कार्यकर्त्यांच्या अडचणी देखील समजून घ्यायला हव्यात, असं त्याचं म्हणणं आहे. याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. राणे यांनी रागावून हा निर्णय घेतला होता. आता मी स्वतः या बाबत लक्ष घालणार आहे. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची कामे केली जातील. मी त्यांना आग्रह केला असा निर्णय घेऊ नका. ज्या तुमच्या अडचणी आहेत त्या समजून घेऊ.
.आम्ही सर्वजण एकाच पक्षासाठी काम करत आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढत असताना कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे, असं मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.
निलेश राणेंनी नेमकं काय म्हटलं होतं?
निलेश राणे म्हणाले, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या एकोणीस-वीस वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भारतीय जनता पक्षामध्ये खूप प्रेम भेटलं आणि भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.
मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.