मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान आरोपी पप्पू शिंदे याच्या आईने मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याची दखल घेत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं येरवडा कारागृह प्रशासन राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश जारी केले आहेत.
काय म्हंटल आहे याचिकेत?
आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याची आई लता बाबूलाल शिंदे यांनी ही याचिका दाखल केली आहे. पप्पूनं याप्रकरणी येरवडा कारागृहात असताना १० सप्टेंबर २०२३ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कारागृहात पप्पूच्या झालेल्या अनैसर्गिक मृत्यूची आता न्यायालयीन चौकशी करावी. कारागृहात पप्पूला देण्यात येणाऱ्या औषधांचा तपशील कोर्टानं मागवून घ्यावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. येरवडा कारागृहासह येरवडा पोलीस ठाणे, गृह विभाग व अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी सामूहिक बलात्कार प्रकरणी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी अहमदनगर विशेष न्यायालयानं आरोपी पप्पू शिंदे याच्यासह अन्य आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे.
ही याचिका प्रलंबित असतानाच आरोपी पप्पू शिंदे याने एके दिवशी कारागृहात आत्महत्या केली. पप्पू हा मानसिक आजारानं त्रस्त होता. वकिलांना याबाबत वेळोवेळी पत्रही लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे कारागृह प्रशासनाला याची पूर्ण माहिती होती. दोन वर्षे त्याला हा त्रास होत होता. या दरम्यान कारागृहातील डॉक्टरांकडून त्याला काही औषधं सुरु होती, असंही याचिकेत नमूद करण्यात आलेलं आहे.