मुंबई : अखेर महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मिळाला. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार असून आज गुरुवारी (5 डिसेंबर 2024) मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. आता नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वाजता मुंबईत येणार, त्यांचा मुंबई दौरा कसा असणार याबाबत माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संध्याकाळी ४.३० च्या दरम्यान मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. यानंतर ते 5.15 च्या सुमारास आझाद मैदानात पोहोचतील. यानंतर देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल. यानंतर अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हे शपथविधी झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी हे रवाना होणार आहेत. असे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील मुंबईत येणार आहेत. अमित शाह हे दुपारी 3.30 वाजता मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्यापूर्वी अमित शाह हे सह्याद्री अतिथीगृहात एक छोटी बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दुपारी ३.३० नंतर ही बैठक होईल. अमित शहा जवळपास 2 तास सहयाद्री अतिथीगृहात असणार आहेत. त्या दरम्यान ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. त्यामुळे शपथविधीपूर्वी तिन्ही नेत्यांची अमित शहांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.