मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते मुंबई आणि नवी मुंबईमध्ये उपस्थित राहणार आहेत. विधानसभेत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर ते मुंबईत येत आहेत. आज भारतीय नौदलाच्या जहाजांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आय एन एस वाघशीर,आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी या युद्धनौका आजपासून भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहेत. 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते, त्यानंतर आज ते पुन्हा, मुंबईत येणार आहेत. तसेच इस्कॉन मंदिराचा आज लोकार्पण सोहळा आहे. आज मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघर येथे उपस्थित असणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या नौदलात पंतप्रधानांच्या हस्ते सकाळी साडे दहाच्या सुमारास आयएनएस निलगिरी,आयएनएस सुरत, आणि आयएनएस वाघशीर या तीन युद्धनौकांना नौदलात सामील केलं जाईल. भारतीय नौदलाचे अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला आपल्या कुटुंबासोबत उपस्थित असणार आहेत.
आयएनएस सूरत, P15B हे सर्वोत्तम दर्जेदार जहाज
आयएनएस सूरत, P15B हे सर्वोत्तम दर्जेदार जहाज असून, जगामधील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक अत्याधुनिक विनाशकारी जहाजां पैकी एक आहे. यातील पंचाहत्तर टक्के साधन सामग्री स्वदेशी बनावटीची आहे. अत्याधुनिक शस्त्र-सेन्सर लावले गेलेले आहेत. आयएनएस निलगिरी, हे P17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकारातील पहिलेच जहाज आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केलेली आहे.
तसेच यामध्ये उत्कृष्टपणे संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता असून सागरी सुरक्षा आणि स्टील्थसाठी अत्याधुनिक वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली आहेत. जो की स्वदेशी फ्रिगेट्सच्या आधुनिक प्रकार आहे. ही आयएनएस वाघशीर, P75 स्कॉर्पीन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी आहे. पाणबुडी बांधणीतील भारताचं कौशल्य यातून दिसून येत आहे. ही पाणबुडी फ्रान्स नौदलाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आलेली आहे.
नरेंद्र मोदी महायुतीतील आमदारांसोबत काय संवाद साधणार ?
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मोदी मंत्र्यांसह आमदारांनाशी संवाद साधणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी आज प्रामुख्याने पहिल्यांदाच महायुतीच्या आमदारांसोबत दुपारच्या वेळी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांची शाळा घेतील की नवीन काही कानमंत्र हे पाहावं लागणार आहे.
खारघरमधील इस्कॉन मंदिराचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते
पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय नौदलाच्या जहाजांचे लोकार्पण झाल्यानंतर आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकर्पण होणार आहे. इस्कॉन मंदिराच्या काही अंतरावरती हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. त्यानंतर खारघर मधील इस्कॉन मंदिराचे लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.