PM Modi in Mumbai:मुंबई : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले पंतप्रधान मोदी यांनी आज नवी मुंबईत विविध प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन केले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यातील आठ महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये मुख्य म्हणजे मुंबई-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोणत्या प्रकल्पांते उद्घाटन केले पाहूयात,
ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह भूमिगत मार्गाचे भूमिपूजन
ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह दरम्यानच्या 9.2 किमी भूमिगत बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे चेंबूर ते मरिन ड्राईव्ह या दरम्यानच्या प्रवासात वेळेची मोठी बचत होणार आहे. चर्चगेट, कुलाबा, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्हची वाहतूक कोंडी सुटणार आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीकडून महत्त्वाकांक्षी मार्गाचं काम करण्यात येणार आहे.
वसई-विरारसाठी मुबलक पाणीपुरवठा
सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. यामुळे वसई, विरारवासीयांची तहान भागणार आहे. सूर्या प्रकल्पामुळे प्रतिदिन 403 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार आहे.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण लेक लाडकी योजना
महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. 2 ऑक्टोबर 2023 पासून ते 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत अभियान सुरू असणार आहे. या योजनेमुळे महसुली विभागात किमान वीस लाख महिलांना लाभ होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान 2 लाख 50 हजार महिला लाभार्थी असतील. तालुकास्तरावर किमान 30 हजार महिलांना योजनेचा लाभ मिळेल. गावस्तरावर 200 महिलांना अभियानाचा लाभ देण्याचं धोरण आहे. त्याशिवाय, 10 लाख महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू
अटल सेतू खुला झाल्याने मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर आता दोन तासांवरून 20 मिनिटांवर आले आहे. मालवाहतूकही जलद होणार असल्याने उद्योगधंदे, व्यापाऱ्यांचाही फायदा होणार आहे. त्यामुळे हा अटल सेतू राज्याच्या विकासात मोठी भूमिका बजावणार आहे. वाहनांवर 400 कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.
नवी मुंबईकरांना मेट्रोचा सुखकर प्रवास
बेलापूर ते पेंधर 11.10 किमीचा मेट्रो मार्गाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नवी मुंबई-पेंधर मेट्रो मार्गावर 11 सुसज्ज स्टेशन आहेत. खारघर, कळंबोली, रोडपाली, तळोजा भागांना मेट्रोचा फायदा होणार आहे. दोन किमीच्या टप्प्यासाठी 10 रुपये तिकीट दर आहे.
खारकोपर-उरण रेल्वे सेवा सुरू
खारकोपर-उरण दरम्यान लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. या दरम्यान 5 नवीन स्थानके असणार असून 40 उपनगरी सेवांचा विस्तार होणार आहे. या लोकलचा नोकरदार, व्यापारी वर्गाला, शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
दिघा गाव रेल्वे स्टेशनचं लोकार्पण
ठाणे स्टेशनपासून 3.2 किमी अंतरावर हे दिघा रेल्वे स्टेशन आहे. ऐरोली स्टेशनपासून 206 किमी अंतरावर स्टेशन आहे. ऐरोली-कळवा कॉरिडॉरचा उन्नत प्रकल्पाचा भाग आहे. दिघा गाव स्टेशनवर 4 प्लॅटफॉर्म, 6 सरकते जिने,
दिघा गाव स्टेशनवर दोन लिफ्टची सोय असून ठाणे, ऐरोलीच्या हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
खार रोड-गोरेगाव रेल्वे सहावा मार्ग
पश्चिम रेल्वेवरील खार रोड ते गोरेगाव दरम्यान सहावा मार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. लवकरच ही मार्गिका सेवेत येणार आहे. ही सहावी मार्गिका मेल, एक्स्प्रेससाठी असणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्ग राहणार. लोकलसह एक्स्प्रेसचा वक्तशीरपणा वाढणार. विरार, बोरिवली, अंधेरीच्या प्रवाशांना फायदा होणार आहे.