मुंबई: मुंबईच्या कांदिवली परिसरातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने घरात घुसून आपल्या प्रेयसीवर चाकुने सपासप वार केल्याची घडण घडली आहे. इमरान अहमद हुसैन चौधरी (वय 30) असं आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, आरोपी इमरान हा विवाहित आहे. काही दिवसांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतरही तो प्रेयसी सोबत रिलेशनशीपमध्ये राहण्यासाठी दबाव टाकत होता.मात्र तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने रागात येऊन तिच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने वार केले. यात तरुणी गंभीर जखमी झाली. त्यानंतर जवळच्या लोकांनी पीडित तरुणीला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कांदिवली पोलिसांनी आरोपी इमरानवर खूनाच्या प्रयत्नासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.