मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना आज निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह देण्यात आलं आहे.
तर रासपचे अध्यक्ष आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना शिट्टी हे चिन्ह देण्यात आलं आहे. प्रहारचे एकमेव आमदार दिनेश बूब यांनाही अमरावती मतदारसंघातून शिट्टी हे चिन्ह देण्यात आलं आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव जानकर यांनी निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांचा पर्याय दिला होता. या चिन्हांमध्ये पहिल्या पसंतीचं चिन्ह म्हणून शिट्टी चिन्ह मागितलं होतं. तर दुसऱ्या पसंतीच्या चिन्हासाठी सफरचंद या चिन्हाची आणि तिसऱ्या पसंतीचं चिन्ह म्हणून रोड रोलच चिन्ह मागितलं होतं. यानंतर निवडणूक आयोगाने जानकर यांच्या पहिल्या पसंतीचं चिन्ह मान्य केलं आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रादेशिक पक्ष फुटून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन नव्या पक्षांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. इतर छोट्या पक्षांना अद्याप निवडणुकीसाठी पक्षचिन्ह देण्यात आलं नाही. मात्र, त्या पक्षांच्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांचं वाटप निवडणूक आयोगाकडून करण्यात येतं आहे.