मुंबई : देशभर ट्रक आणि बसचालकांनी आंदोलन पुकारले आहे. इंधनाची वाहतूक आणि पुरवठा करणाऱ्या वाहनांवरील चालकही संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारी सकाळपासूनच पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी मोठी गर्दी केली आहे. परिणामी ट्रक-बस चालकांच्या संपाचा फटका एसटीलाही बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. डिझेल अभावी एसटी बस सेवा बंद होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तवली आहे.
नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी सोमवारपासून आंदोलने सुरू केले आहेत. याप्रमाणेच राज्यात देखील नवी मुंबई, मुंबई, ठाणे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह महत्त्वाच्या शहरात ट्रक आणि बस चालकांचे आंदोलन सुरू आहे. यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. विदर्भात आंदोलन चिघळले असून विदर्भातील काही आगारांमधील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या अनेक गाड्या डिझेलवर धावतात. दररोज एसटीच्या सरासरी १४ हजार बसगाड्या धावतात. या बससाठी दररोज सरासरी ११ लाख लिटर डिझेल लागते. एसटी बसला लागणाऱ्या डिझेलची पूर्तता न झाल्यास एसटीची सेवा खोळंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटीमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, संप आणखी काही दिवस सुरू राहिल्यास डिझेलचा तुटवडा निर्माण होईल आणि एसटी बसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागतील, अशी माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.