ठाणे: ठाणे (Political Crisis) महापालिका निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेने 75 जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केलं आहे. मात्र, युतीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी थेट “विरोधात बसण्याची तयारी” दर्शवली आहे.

ठाण्यातील 131 जागांपैकी महायुतीने 103 जागा जिंकल्या शिवसेना-75, भाजप-28 असे आकड्यांचे गणित आहे. दरम्यान, शिंदे सेना एक हाती सत्ता स्थापन करू शकते. शिवसेनेला कोणाच्याही पाठिंब्याची गरज उरलेली नाही. हीच बाब भाजपच्या जिव्हारी लागली आहे. “सत्ता अमर्याद नसावी, त्यावर अंकुश हवा,” असे म्हणत भाजपने विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे संकेत दिले आहेत.
ठाण्यातील ‘फिल्डिंग’, मुंबईत ‘गेम’?
मुंबईत भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे. ठाण्यात शिंदेंची कोंडी केली, तरच मुंबईत शिंदे गट भाजपसमोर झुकती भूमिका घेईल. मुंबईसाठी भाजपने ठाण्यात हे ‘विरोधी पक्षाचे’ अस्त्र बाहेर काढले असल्याची चर्चा आहे.
निवडणुकीनंतर युतीमध्ये होणारा हा संघर्ष आगामी महापौर निवडण्याच्या वेळी रंगत आणणारा ठरेल. जर भाजप खरोखरच विरोधात बसला, तर ठाणे महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही एकाच ‘महायुती’चे असतील, जो महाराष्ट्राच्या राजकारणात एक दुर्मिळ प्रयोग ठरू शकतो.







