कल्याण: कल्याण-डोंबिवली (Political Crisis) महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा शांत होतो न होतो, तोच शहरात सत्तेच्या सारीपाटाचा खेळ सुरू झाला आहे. विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता ‘संख्याबळ’ गोळा करण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाने टोक गाठले आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाकडून ठाकरे गटाच्या नगरसेवकांना फोडण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून, या दबावामुळे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीला चक्क जंगलात आश्रय घ्यावा लागल्याची खळबळजनक चर्चा रंगली आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे आणि ॲड. कीर्ती ढोणे यांनी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. यामुळे ठाकरे गटात अस्वस्थता असतानाच, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. स्वपक्षाचे उमेदवार असताना दुसऱ्यांचे उमेदवार फोडण्यावर शक्ती का खर्च केली जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मित्रपरिवाराने दिलेल्या देणगीतून निवडणूक लढवून जिंकलेल्या खंबायत यांना शिंदे गटाकडून मोठ्या आर्थिक प्रलोभनांसह दबाव सहन करावे लागल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षाशी गद्दारी करण्यापेक्षा त्यांनी काही काळ संपर्क क्षेत्राबाहेर राहण्याचे ठरवले. लोकप्रतिनिधी दबावापोटी अशा प्रकारे जंगलात लपून बसल्याने मोठी चर्चा सुरु झाली आहे.







