कल्याण : कल्याण रेल्वे स्ठानकात स्फोटके ठेवणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कल्याण स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 वर 21 फेब्रुवारीला स्फोटकांच्या 54 इलेक्ट्रीक डेटोनेटरच्या काड्या आढळल्या होत्या. त्यामुळे स्टेशन परिसरात खळबळ उडाली होती. या वेळेस कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बॉम्ब स्कॉटच्या मदतीने हे स्फोटक इलेक्ट्रीक डेटोनेटरच्या काड्या ताब्यात घेतल्या होत्या.
पोलिसांनी त्यानंतर अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांचा शोध सुरू केला. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने स्फोटक पदार्थांची बॅग स्टेशनवरती टाकणाऱ्या दोघांना अखेर बेड्या ठोकल्या आहेत. जॉय डेव्हिड कालवा उर्फ नायडू, ऋषीकेश देविदास निकुंभ अशी या आरोपींची नावे आहेत. कल्याण लोहमार्ग पोलिसांना या प्रकरणात मोठे यश आले. मात्र,अद्यापही तपास पूर्ण झालेला नाही, अशी माहिती समोर येत आहे.
आरोपींना बॅग चोरली मग…
हे दोघे एक सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांनी कल्याण स्काय वॉकवर रात्री झोपलेल्या दाम्पत्याची बॅग चोरली. त्यानंतर ते ती बॅग घेऊन प्लॅटफॉर्म नंबर एकवर आले. त्यांनी अंधारात त्या बॅगेत काही मौल्यवान वस्तू मिळतात का? याची तपासणी केली. त्यांनी बॅगेतले गरजेचे सामान काढून घेतले. त्यानंतर त्यांनी स्फोटक पदार्थ बॅगेत टाकले. स्फोटकांनी भरलेली बॅग कल्याण स्टेशनवर ठेवून त्यांनी तिथून पळ काढला.
आरोपींना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता रेल्वे न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ती बॅग आणणारे ते दोघे कोण होते? याचा तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करत आहेत. आरोपींचा कल्याण रेल्वे स्थानकावर मोठा घातपात घडवण्याचा कट होता की त्यांना दुसरीकडे घातपात घडवायचा होता? त्यांनी ती स्फोटकं का बाळगली? कल्याण रेल्वे स्थानकावर का ठेवली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.