मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत पोलिसांचा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १-२ हजार नव्हे तर तब्बल 12 हजारांपेक्षाही अधिक पदे ही पोलिसांची रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्त संख्या ही शिपाई पदांची आहे.
सध्या अप्पर पोलीस आयुक्तपदापासून शिपाईपदापर्यंत तब्बल 12 हजार 899 पदे ही रिक्त असल्याची माहिती आहे. यामुळे याचा ताण आहे त्या पोलीस यंत्रणेवर पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करून मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती, त्यातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त विनोद कांबळे यांनी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंतची माहिती दिली आहे.
यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय की, तब्बल 12 हजार 899 पदे ही रिक्त आहेत. मुंबई पोलीस दलात एकूण मंजूर पदांची संख्या 51,308 आहे. यात 38,409 कार्यरत पदे असून 12,899 एकून पदे रिक्त आहेत. पोलीस शिपायाची 28,938 पदे मंजूर आहेत. यापैकी 17,823 कार्यरत पदे असून 11,115 एकून रिक्त पदे आहेत.
पोलीस उपनिरीक्षकाची 3,543 पदे मंजूर असताना फक्त 2,318 कार्यरत पदे असून 1,225 पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षकाची 1,090 मंजूर पदे असून यापैकी 313 पदे रिक्त आहेत. ही खरोखरच एक हैराण करणारी माहिती नक्कीच म्हणावी लागणार आहे. अनेक पदे ही रिक्त आहेत. भरती प्रक्रिया कधी होणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो.