मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलने आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी 14 रोजी रात्री घडली आहे. विजय साळुंखे (वय-38) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी सायनमधील प्रतीक्षा नगर येथे राहत्या घरात गळफास घेतला. पत्नीच्या त्रासाला कंटाळून विजय यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय साळुंखे मुंबईतील सायनच्या प्रतीक्षा नगर येथे वास्तव्यास होते. त्यांची 30 मे रोजी मुंबईच्या शाहुनगर पोलिस स्टेशनमध्ये बदली झाली होती. मात्र, आजारपणाचे कारण सांगत त्यांनी रजा घेतली होती. गळफास घेतल्यानंतर साळुंखे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. या प्रकरणी मुंबईतील वडाळा टी टी पोलिसांनी साळुंखे यांच्या अपमृत्यूची नोंद केली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. तसेच विजय साळुंखे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी जप्त केली. साळुंखे यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.