मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, वाशिम आणि ठाणे येथे विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. नरेंद्र मोदी सकाळी 11.15 वाजता वाशिममधील जगदंबा माता मंदिरात जाऊन दर्शन घेणार असून त्यानंतर संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहतील.
नरेंद्र मोदी यांचे वाशिममधील कार्यक्रम
वाशिममध्ये मोदी हे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील. या योजनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता वितरित केला जाणार असून, यामुळे सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे 1,920 कोटी रुपयांचे 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित करणार आहेत. तसेच, 9,200 शेतकरी उत्पादक संघटनांचे राष्ट्रार्पण करतील. तसेच, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या “बंजारा विरासत संग्रहालयाचे” मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
ठाण्यात 32,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ
नरेंद्र मोदी ठाणे येथे सुमारे 32,800 कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये मुंबई मेट्रो लाईन 3 फेज 1 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. हा प्रकल्प मुंबईतील शहरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवाय, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी होईल. ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचा पायाभरणी समारंभही पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे.
ठाण्यातील आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) प्रकल्प, ज्याची फेज-1 पायाभरणी होणार आहे. या प्रकल्पामुळे या भागातील पायाभूत सुविधा विकासाला गती मिळणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या कृषी, नागरी आणि औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन मोदी करणार आहेत.