मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा गटाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. हे सगळ सुरु असताना अजित पवार यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे यापुढे अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये, बॅनर्सवर, जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाअधिक वापर केला जाणार आहे.
गुलाबी रंग मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी स्वत: अजित पवार देखील प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी यापुढे अजित पवार हे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर केवळ गुलाबी जॅकेट परिधान करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी अजितदादांनी 12 गुलाबी रंगाची जॅकेट शिवून घेतल्याचेही माहिती मिळत आहे. याशिवाय, अजित पवार यांनी कुर्ता आणि जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह लावण्यासही सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या पक्षाने अचानक गुलाबी रंगाचा वापर का सुरु केला याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत.
गुलाबी रंग का?
अजित पवार गटाने नुकतेच त्यांच्या पक्षाच्या प्रसिद्धीचे काम नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला दिले आहे. या कंपनीच्या सल्ल्यानुसारच अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या सर्व आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याची चर्चा होती. यानंतर या कंपनीच्या सल्ल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिमावर्धन करण्यासाठी अजितदादा गटाकडून गुलाबी रंगाचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे.
सॉफ्ट हिंदुत्त्वासाठी तर नाही ना?
अजित पवार यांनी विधानपरिषद निवडणुकीपूर्वी आपल्या सर्व आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. अजित पवार यांची प्रतिमा सॉफ्ट हिंदुत्त्वाकडे झुकणारी असावी, यासाठी नरेश अरोरा यांच्या सल्ल्याने ही सिद्धिविनायक वारी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.