मुंबई : महिला मतदारांना खुश करण्यासाठी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी मुंबई महापालिकेच्या योजनेचा गैरफायदा घेत प्रेशर कुकर खरेदी व वाटपात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्याची मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते निखिल कांबळे यांच्या वतीने अॅड. संदेश मोरे आणि अॅड. हितेंद्र गांधी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन आमदार दिलीप लांडे यांनी पालिकेच्या या योजनेचा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी लाभ उठवला. जागोजागी लाडकी बहीण सन्मान सोहळा कार्यक्रम घेऊन याच कुकरचे मोफत वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करून याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. तसेच या घोटाळ्याप्रकरणी आमदार दिलीप लांडे व एल प्रभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त धनाजी हिर्लेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे तसेच उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीमार्फत न्यायालयीन चौकशीचे आदेश द्या, अशी विनंती याचिकेत केली आहे.