मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलीच खंडाजगी होताना दिसत आहे. माझ्याकडे माणूस पाठवून मला ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. त्यानंतर अॅंटिलिया खटल्यातील आरोपी सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले.
आता परमवीर सिंह यांनीदेखील अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. पोलीस विभागावर दबाव तंत्र टाकणारे महाविकास आघाडीचे गलिच्छ सरकार होते. असे मी माझ्या 34 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये पाहिले नाही आणि पुढे पाहणार नाही, असे आरोप परमवीर यांनी केले आहेत. ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत होते.
काय म्हणाले परमवीर सिंह?
अनिल देशमुख यांच्या मुलाने माझी पाया पडून माफी मागितली होती. माझ्याशी पंगा घेताल तर मी ही तयार आहे. मी अनिल देशमुख यांचे 10 ते 20 टक्केच प्रकरण बाहेर काढले आहे. वेळ आली तर सर्वच बाहेर काढेन असा इशारा परमवीर यांनी दिला आहे. अॅंटिलिया प्रकरणाच्या दबावामुळे मी आता बोलतोय असं नाही, तर माझ्यावर अनिल देशमुख यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्याचे खंडन करण्यासाठी मी बोलोय. मुंबईतून 100 कोटी रुपये जमा करून देण्याचे टार्गेट होते आणि हे सर्व पैसे जयंत पाटील यांच्याकडे जमा करायला लागातील असं अनिल देशमुख यांनी मला सांगितले होते, असं परमवीर सिंह यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे-शरद पवारांचा माझ्यावर दबाव : परमवीर सिंह
पुढे बोलताना परमवीर सिंह म्हणाले, मलाही अनेक गुन्ह्यात अडकवण्यासाठी अनेक गुन्हेगारांची मदत घेण्यात आली. त्यांच्या बैठका अनिल देशमुख यांच्याकडे व्हायच्या. मला गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यांना कोणत्यातरी केसमध्ये अटक करण्यासाठी दबाव होता. दरेकर यांनी बँक प्रकरणात अडकवण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती. तसेच देवेंद्र फडवणीस आणि एकनाथ शिंदे यांनाही केसमध्ये गोवण्यासाठी माझ्यावर दबाव होता. शिंदे यांच्या पक्षातील लोकांनाच उद्धव ठाकरेंनी तसे करायला सांगितले होते, असंही परमवीर सिंह म्हणाले.