मुंबई : मुंबईत एका आयटीत काम करणाऱ्या 29 वर्षीय तरुणीची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अॅनलाईन संकेतस्थळावरून निवडलेल्या भावी जोडीदाराने तिला लग्नाचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. नबिल मुनिर खान असं फसवणूक करणाऱ्या आरोपिचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या भांडुप परिसरात राहणारी 29 वर्षीय तरुणी ही आयटी क्षेत्रात काम करते. तिने ऑनलाईन विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यानंतर 1 मार्च रोजी नबिल मुनिर खान याने पाठवलेली रिक्वेस्ट तिने स्वीकारली. त्यानंतर फास्ट फूडची फ्रेंचाईजी असल्याचं आणि दक्षिण आफ्रिकेत मायनिंगचा व्यवसाय, डोंगरीत वडील ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात, असं तरुणीला आरोपीने सांगितलं.
तरुणीकडून वेळोवेळी पैसे उकळले
अधिक माहिती अशी की, आरोपी नबिल खान याने वेगवेगळ्या कारणांनी तरुणीकडून पैसे उकळले. त्याने स्वतःचे बँक खाते फ्रीज झाल्याचे सांगत तरुणीला ठाण्यातील सेकंडहँड मोटारसायकल डिलरला सव्वा लाख रुपये देण्यास सांगितले. ते अलिबागला फिरायला जात असताना तेथेही नबिल खान याने तरुणीकडून एक लाखाचा मोबाईल घेतला. त्यानंतर मामाला कॅन्सर झाल्या आहे असे सांगून एक लाख रुपये उकळले.
दुसऱ्याही तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक..
दरम्यान, 19 मार्च रोजी नबिल खानला अचानक पोलिसांनी चौकशीसाठी नेल्याचे तरुणीला कळले. डीएन नगर पोलीस ठाण्यात गेल्यावर नबिल खानने आणखी एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तरुणीला तिची फसवणूक झाल्याचे समजले. नबिल खान अशाच प्रकारे तरुणींना जाळ्यात ओढून फसवणूक करत असल्याची तिची खात्री झाली. त्यानंतर नबिल खान विरोधात भांडुप पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.