मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात महायुतीला बहुमत प्राप्त झालं असून महायुती सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे, महायुतीच्या प्रमुख पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी पार पडत आहेत. तसेच अनेक जणांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी निवडणूक कॅम्पेन करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनीही अजित पवारांच्या विजयाबद्दल त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु, यावेळी त्यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवल्याने वाद निर्माण झाला आहे. आमदार अमोल मिटकरींनी नरेश अरोरा यांना यावरुन चांगलंच सुनावलं असून शेवटी तुम्ही पगारावरील शिपाई असल्याचा टोलाही लगावला होता. पण, या वादात अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी उडी घेत अमोल मिटकरींना चांगलंच झापलं आहे. अमोल मिटकरींनी मीडियाला बाईट देऊ नयेत, असा इशारा सुद्धा पार्थ पवार यांनी मिटकरींना दिला आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप शिंदेंची शिवसेना व अजितदादांच्या राष्ट्रवादीसह नव्याने बनलेल्या महायुतीला मोठं यश मिळालं. लोकसभेला महायुतीला चांगलाच फटका बसल्यानंतर आता अत्यंत सावध व सतर्क राहून महायुती या निवडणुकीला सामोरी गेली. त्यामध्ये या तिन्ही पक्षांनी लाडक्या बहिणीवरुन मोठं कॅम्पेनिंगही केलं होतं. त्यात, अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला.
यावेळी, अजित पवारांच्या मिडिया कॅम्पेनिंगमध्ये नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीनेही पीआर एजन्सी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अजित पवारांचं गुलाबी कॅम्पेन त्यांच्याच माध्यमातून करण्यात आलं होतं. त्यामुळे, आता विजयानंतर श्रेयवादाची लढाई पाहायला मिळू लागली आहे. अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांच्यावर जोरदार टीका करत थेट तुम्ही पगारी शपाई असल्याचं म्हटलं असून एका वर्तमानपत्रात लेख लिहित यशाचे डिझाईन राष्ट्रवादीचेच असा टोला सुद्धा लगावला आहे. त्यावरुन पार्थ पवार यांनी मिटकरींना चांगलंच सुनावलं आहे.
नेमकं काय म्हणाले पार्थ पवार?
अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे आमदार असूनही पक्षाच्या भूमिकेविरुद्ध भूमिका घेत आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे. नरेश अरोरा आणि DesignBoxed संदर्भातील त्यांच्या वक्तव्याचा माझा पक्ष आणि माझे वडिल अजिबात समर्थन करत नाहीत. तसेच, मिटकरी यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये, असे मतही पार्थ यांनी इंग्रजीत ट्विट करुन मांडले आहे. त्यामुळे, पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना गुलाबी वादळावरुन सुरू झालेल्या वादात चांगलंच झापल्याचे दिसून येत आहे.