बदलापूर : बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे बदलापूरच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. बुधवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे. शाळेकडून हे प्रकरण दाबले गेल्याचा आरोप केला जात असल्याने पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. आज बदलापुरात बंद पुकारण्यात आला असून शाळेच्या गेटवर नागरिकांचा मोठा जमाव एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
नामांकित शाळेतील दोन चिमुकलींवर एका सफाई कर्मचा-याने लैगिंक अत्याचार केल्याचे समोर आल्याने लोकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे, तर काही सफाई कर्मचा-यांना देखील काढून टाकण्यात आले आहे. याप्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आज नागरिकांनी शाळेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
याशिवाय काही नागरिकांनी बदलापुरात रेल रोको केला. बदलापूर रेल्वे स्थानकात मुंबईकडे जाणारा मार्ग रोखला. आज सकाळपासून बदलापुरातील रिक्षा सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहे.
पालकांचा संताप का?
– घटना समोर आली तेव्हा शाळेच्या संचालक मंडळाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला
– शाळेची बदनामी होईल या भीतीने संचालक मंडळाने काही कारवाई केली नाही असा पालकांचा आरोप
– संचालक मंडळातील काही पदाधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही पालकांचा आरोप
– शाळा प्रशासन निवेदन घ्यायला समोर येत नसल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.
– कारवाई करण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी संचालक मंडळ आणि मुख्याध्यापकांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी