पनवेल : राग हा माणसाचा शत्रू आहे. रागामुळे भयानक परिस्थिती उद्भवून संसाराची राखरांगोळी झाल्याची धक्कादायक घटना पनवेल येथे घडली आहे. बहिणीच्या घरी बायको येत नसल्याच्या रागातून पती-पत्नीमध्ये वाद झाला, वाद बघता-बघता इतक्या टोकाला गेला की पतीने पत्नीवर थेट ॲसिड हल्ला केला.
पनवेलमधील खैरणे गावात ही घटना घडली. यात पत्नी गंभीर रित्या भाजली गेली. रमजान सिद्दीकी (28) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर, अमीना असे पीडित पत्नीचे नाव आहे. रमजान याला हैदराबादमध्ये त्याच्या बहिणीच्या घरी जायचे होते. आपल्यासोबत चल असे तो पत्नीला सांगत होता. मात्र त्याची पत्नी काही सोबत येण्यास तयार नव्हती.
याच मुद्यावरून त्यांचे भांडण झाले आणि हळूहळू ते इतके वाढले की वाद विकोपाला गेला. त्या भांडणामुळे संतापलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीच्या चेहऱ्यावरती ॲसिड टाकलं. यामुळे ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर पत्नी अमिना तातडीने पश्चिम बंगाल येथे निघून गेली. तेथे तिच्यावर एन.सी.एम.सी. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तेथे जाऊन तिने पतीविरोधात बनियापुकुर येथे तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी गुन्हा दाख केला. त्यानंतर याबाबतचा गुन्हा पनवेल तालुका पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला आहे.