मुंबई : पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या करुन आरोपीने पत्नीचा मृतदेह 12 तासांपेक्षा जास्त वेळ एका मोठ्या फ्रीजमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पेल्हार पोलिसांनी अटक करून नायगांव पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
खुर्शीदा खातून चौधरी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, इस्माईल अब्दुल कयूम चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्माईल आणि खुर्शीदा या जोडप्यांचा जून महिन्यात विवाह झाला होता. परंतु, पत्नीचा घराजवळील परिसरातील एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय पतीला होता. पती इस्माईल एकेदिवशी बुधवारी दुपारी 2 वाजता अचानक जेवायला घरी आला. त्यावेळी त्याने बराच वेळ घराची कडी वाजवली होती, मात्र पत्नी खुर्शिदा दार उघडत नव्हती. काही वेळानंतर, त्याच्या पत्नीने दरवाजा उघडला आणि त्याला घरात आणखी एक व्यक्ती दिसला, जो लगेच पळून गेला. इस्माईलने या व्यक्तीबद्दल विचारले. पण त्याची पत्नी त्याची दिशाभूल करत होती. यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपीने तिच्याच ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण लपवण्यासाठी पत्नी खुर्शिदाची हत्या केल्यानंतर आरोपीला तिचा मृतदेह दफन करायचा होता. पण त्यासाठी त्याला मृत्यू दाखल्याची गरज होती. त्यांनी काही डॉक्टरांना बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवण्यासाठी सांगितले. पण या सर्वांनी बनावट मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी नकार दिला. त्यानंतर तो ओला कारमध्ये पत्नीचा मृतदेह घेऊन वसई पूर्व नवजीवन परिसरात राहणाऱ्या त्याच्या भावाकडे गेला.
आरोपी आणि त्याच्या भावानी मिळून तिचा मृतदेह खराब होऊ नये म्हणून एका मोठ्या फ्रीजमध्ये ठेवला आणि बनावट मृत्यू प्रमाणपत्रे बनवणाऱ्या डॉक्टरांचा शोध सुरू केला. मात्र, या काळात, पेल्हार पोलिसांना खबऱ्यांकडून बनावट मृत्यू प्रमाणपत्रांची मागणी करणाऱ्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. तसेच खुर्शीदाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.