पालघर : डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेतील 27 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे डहाणू तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी रात्रीच्या जेवणासाठी आश्रम शाळेत दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यात आली होती. जेवण करुन सर्व विद्यार्थी झोपी गेले. मात्र, मंगळवारी पहाटे आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींना मळमळ होऊ लागली. त्यानंतर 27 विद्यार्थिनींना उलट्या होऊ लागल्या. या सर्व विद्यार्थिनींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींना सोमवारी रात्रीपासूनच त्रास होण्यास सुरुवात झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करुन तातडीने उपचार सुरु करण्यात आले. त्यापैकी आठ विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत, तर 20 विद्यार्थिनींना प्राथमिक उपचार करून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर 10 विद्यार्थिनींना ऐना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती कासा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रदीप भोये यांनी दिली आहे.
दरम्यान, डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कांबळगाव येथील सेंट्रल किचन मधून विद्यार्थिनींना भोजन पुरवठा करण्यात येतो. हे सेंट्रल किचन शासन स्वतः चालवते. सोमवारी रात्रीच्या जेवणासाठी दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यात आली होती. या भाजीमधून ही विषबाधा झाली असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे.