Palghar Earthquake : पालघर : पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यात गेल्या 5-6 वर्षांपासून भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रमाण सुरू झाले आहे. शुक्रवारी रात्रीही डहाणू आणि तलासरी परिसरातील गावांना भूकंपाचे सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे धक्के जाणवले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. धुंदलवाडी, तलासरी, घोलवड, बोर्डी आणि इतर गावं भूकंपाच्या धक्क्यानं हादरली आहेत.
3 जानेवारी रोजी दुपारी 1:47 वाजता पालघरच्या डहाणू तालुक्यातील काही भागात 3.4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र अद्याप भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे, हे स्पष्ट झालेले नाही. गेल्या वर्षी 2023 मध्ये पालघरमध्ये 3.5 आणि 3.3 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.
धुंदलवाडी हे भूकंपाचं मुख्य प्रवण क्षेत्र असल्यानं या परिसरातील अनेक जवळील गावात काही घरांच्या भिंतींना हलक्याशा भेगा पडून तडा गेला आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा घाबरले आहेत. तसेच, या परिसरातील शाळकरी विद्यार्थी यांच्यात मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. डहाणू, तलासरी परिसरात भूकंप सत्र सुरु असताना अनेक नागरिकांच्या घरांचं नुकसान झालं होतं. यासाठी प्रशासनानं अनेक उपाय योजना देखील केल्या होत्या. मार्गदर्शन शिबीर आयोजित केली होती.