मुंबई : राज्यात सद्या आगामी निवडणुकांचे वारे वाहत असून राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून मैदानात उतरलेले दिसत आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र्रात महायुतीला चांगलाच फटका बसला होता. त्याअनुषंगाने आता अजित पवार यांना महायुतीत घेतल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला अशी चर्चा सुद्धा सुरु आहे. याबाबत संघानेही अशीच काहीशी भूमिका मांडली होती. याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
‘विरोधी पक्षनेता असताना तुम्ही ज्या पक्षावर सर्वाधिक हल्ले केले. ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा त्यांना तुम्ही सामील करून घेतले. लोक म्हणतात की, देवेंद्र फडणवीसांनी जे केले, ते भाजपाच्या मूळ विचारांना, भाजपाच्या एकनिष्ठ मतदाराला हे आवडलं नाही आणि त्यामुळे लोकसभेला तुमची अशी अवस्था झाली’, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बघा, मला भाजप, आरएसएस कार्यकर्ते यांना सांगायचं नाही, तुम्हाला सांगायचं आहे. त्यांना मी सांगितलं आहे. भाजप आणि आरएसएस दोघांनाही मी सांगून बसलो आहे.”
ते पुढे म्हणाले की, “मी इतकंच सांगेन की हो… मी ही गोष्ट मान्य करतो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला जेव्हा सोबत घेतले. ते आमच्या मतदारांना आवडलं नाही. अजिबात आवडलं नाही. पण, आम्ही जेव्हा परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवली की, ते जेव्हा आमच्यासोबत आले, ते कोणत्या परिस्थितीत आले.
कोणत्या परिस्थितीत त्यांना सोबत घ्यावे लागले. आमच्या मतदारांच्या, आमचे जे कोअर लोक आहेत, त्यांच्या हे लक्षात आले आहे की, राजकारणात अनेकदा अशी परिस्थिती येते, जेव्हा तडजोड करावी लागते.”
“अशा अनेक तडजोडी असतात की, ज्या तुम्हाला किंवा तुमच्या लोकांना मनापासून आवडत नाहीत, पण कराव्या लागतात. अशा तडजोडी आम्ही या प्रकरणात केल्या. पण, आज मी विश्वासाने सांगू शकतो की, १०० टक्के नाही, पण ८० टक्के लोकांना आम्ही समजवण्यात यशस्वी झालो आहोत की, आम्ही हे का केले”, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.