मुंबई: विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करणार असल्याचे संकेत शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या मुंबईतील खासदार, आमदार, नेते आणि उपनेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, महापालिका निवडणुकीपूर्वी संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. खासदार डॉ. शिंदे यांनी महापालिका निवडणुकीसंदर्भातील पक्षाच्या रणनीतीबाबत चर्चा केली. पक्ष संघटना मजबूत करण्याचे निर्देश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, माजी खासदार गजानन कीर्तीकर, राहुल शेवाळे, शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मुरजी पटेल, माजी आमदार सदा सरवणकर, मीनाताई कांबळी, शीतल म्हात्रे आणि पक्षाचे सचिव यावेळी उपस्थित होते.
येत्या २३ जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलनात शिवसेनेचा भव्य मेळावा होणार आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विजयी आमदार आणि खासदारांचा सत्कार केला जाईल, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले की, लवकरच पक्ष संघटनेत फेरबदल केले जातील. पदाधिकाऱ्यांनी कशाप्रकारे काम केले याचा आढावा घेऊन समिती पक्ष संघटनेतील नव्या नियुक्तो करेल, पक्षाकडून मुंबईत २४ जानेवारीपासून ९ फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाईल. आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी सभासद नोंदणी असेल, असा विश्वास कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
अध्यक्षपदावरून ठाकरेंची हकालपट्टी करा
शिवसेनेच्या विचारधारेला काळिमा फासण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. लाचारी करून काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असा घणाघात शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. स्मारकाचा खर्च शासनाचा असून उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबाप्रमाणे अध्यक्षस्थानी बसले आहेत. त्यामुळे त्यांची स्मारकाच्या अध्यक्षपदावरून ताबडतोब हकालपट्टी व्हावी, अशी मागणी कदम यांनी केली. या बैठकीत तसा ठराव घेण्यात आला असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाईल, असे कदम यांनी म्हटले.