मुंबई : आत्तापर्यंत राज्यात 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत, तेवढ्या सर्वांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांकडून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
अवघे दोन दिवस शिल्लक
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची चांगलीच धावाधाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा 20 जानेवारीपर्यंत मार्गी लावा अन्यथा मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे सरकार आता ॲक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया…
दरम्यान यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया आली आहे. ‘या आदेशाची अंमलबजावणी होणार का?, आतापर्यंत खूप आदेश झाले. आम्हाला 54 लाख मराठ्यांना 20 जानेवारीच्या आत प्रमाणपत्र दिले पाहिजे. असे आदेश काढून त्याची अंमलबजावणी होणार असेल तर बघावं लागेल. मात्र, प्रमाणपत्र 20 जानेवारीच्या आधी दिले तर त्याबाबत पाहू असे जरांगे म्हणाले. नुसता आदेश काढून चार दोन लोकांना वाटलेले आम्हाला मान्य नाही. आता मराठा फसणार नाही. वेळे प्रसंगी माझा सरकारने जीव घेतला तरी मी तयार आहे’, असे ते म्हणाले.
‘मागील दोन महिन्यात तुम्ही काही केले नाही, ही तुमची चूक आहे. विशेष बाब करून 20 जानेवारीच्या आत हे करा, गाव पातळीवर तुमची यंत्रणा आहे. आज 18 तारीख आहे, अर्ज भरून घ्यावेत, गावागावात तलाठी, ग्रामसेवक आहेत. उद्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र वाटप करा आणि प्रमाणपत्र वाटप केल्याचा तो डाटा आम्हाला द्यावा. नहीतर, आम्ही मुंबईला जाणारच, आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार, नाही मिळाल तरी मुंबईला जाणार. मिळाल्यावर गुलाल टाकायला जाऊ’, असे जरांगे म्हणाले आहेत.