मुंबई : नवी मुंबई मनपा रुग्णालयात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मनपा रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोज कुमार असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. कुमार हा वाशी येथील नवी मुंबई मनपा प्रथम संदर्भ रुग्णालयात काम करत होता.
दरम्यान, २५ वर्षीय मनोज कुमार रुग्णालयात काम करत असताना त्याच्या सुरक्षेची कोणतीही काळजी कंत्राटदाराने घेतली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे. तसेच या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करुन कामगाराला देखील योग्य मोबदला देण्याची मागणी संघटनेकडून होत आहे. विशेष म्हणजे मनोजचे पुढील महिन्यात लग्न होते. मात्र त्या आधीच त्याच्यावर काळाने घाला घातला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.