मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच बसून राहणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या जवळच ईडीचं कार्यालय असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ईडी कार्यालयाच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. बारामती अॅग्रोप्रकरणी ही चौकशी होणार आहे. 19 जानेवारी रोजी रोहित पवारांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. तसेच 24 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देखील दिले आहेत. त्यामुळे रोहित पवार या चौकशीला हजर राहणार आहेत.
दरम्यान रोहित पवारांच्या घरी अनेक दिवसापासून ईडीची छापेमारी सुरु होती. मात्र त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेल नव्हत. तसेच मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत आहे म्हणून माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं रोहित पवारांकडून वारंवार सांगण्यात येत होतं. मात्र या वेळी आलेल्या नोटीसीनंतर रोहित पवार यांनी चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.