मुंबई : मुंबई ते पनवेल प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता रेल्वे विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षात सीएसएमटी ते पनवेलदरम्यान प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. हार्बर मार्गासह ट्रान्सहार्बर आणि नेरुळ-खारकोपरदरम्यान रुळांची वेगक्षमता १०५ किलोमीटर प्रतितास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळं सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ आता 80 मिनिटांवरून थेट 65 ते 70 मिनिटांवर आला आहे.
तसेच खारकोपर ते उरण लोकल लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी दिली. महाव्यवस्थापक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रामकरण यादव यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
सीएसएमटी ते पनवेलदरम्यान सध्या ताशी ८० किमी वेगाने लोकल धावतात. या वेगाने सीएसएमटी ते पनवेल अंतरासाठी ८० मिनिटे लागतात. ‘हार्बर’वरील प्रवासवेळ वाचवण्यासाठी ताशी १०५ वेग निश्चित करण्यात आला आहे. या वेगामुळे सीएसएमटी ते पनवेल अंतर ६५-७० मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल.
मध्य रेल्वेच्या वतीनं सीएसएमटी- पनवेल मार्गावर 188 आणि सीएसएमटी ते बेलापूर मार्गावर 79 रेल्वे गाड्या चालवल्या जातात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आता ठाणे आणि पनवेल मार्गावरील गाड्यांचा वेग ताशी 80 किमीवरून 105 किमीवर आणण्यासाठीचं काम सुरु आहे, ज्यामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.