मुंबई : आता मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी विमानप्रवासाच्या धर्तीवर आदरातिथ्य आणि व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार लावला जाणार नाही. प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे असे प्रतिक्रिया एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या बैठकीमध्ये केले आहे.
एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या अनेक विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मूल व धारणी येथे नवे आगार निर्माण होणार
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या 253 होणार आहे.
प्रवाशांच्या सेवेत आनंद आरोग्य केंद्र..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या 343 बस स्थानकांवर “आनंद आरोग्य केंद्र” या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील 400 ते 500 चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा द्यायची आहे.
प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल..
एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन 10X10 आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन 2500 साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे, तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.