मुंबई: तलाठी भरती प्रक्रियेमध्ये 48 उमेदवारांना 200 पेक्षा अधिकचे गुण मिळाल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. 200 गुणांचीच परीक्षा असताना अधिक गुण कसे मिळाले? याबाबत आर्श्च व्यक्त केले जात आहे. मात्र, त्यावर आता महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने खुलासा करण्यात आला आहे. कुठलाही गैरप्रकार नसून हे केवळ गैरसमजुतीतून, अज्ञानातून घडलं आहे, असे शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.तर दुसरीकडे परीक्षा निकाल रद्द करू नये अशी मागणी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
तलाठी भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. अशा पद्धतीचे आरोप आमदार, मंत्र्यांनी व्यक्त केले आहेत. गेल्या वर्षी तलाठी भरती परीक्षा 3 भागात आणि 57 सत्रामध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत तलाठी पदासाठी 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. पण निकाल जाहीर झाला आणि एकच गोंधळ उडाला. निकालानंतर संपूर्ण परीक्षाच रद्द करा अशी मागणी होत आहे. त्यामुळे मोठ्या अभ्यासानंतर परीक्षा पास झालेले उमेदवार निराश झाले आहेत.
गुणांचे सामान्यीकरण केल्याने हे घडलं
या आधी झालेले घोळ पाहून या वेळेसची तलाठी परिक्षा टीसीएस या कंपनीने घेतली. परीक्षेनंतर उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे टीसीएस कंपनीने तीन वेळा शंकासमाधान केले आहे. टीसीएसनं 57 प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया केली आहे. हीच प्रक्रिया कोणाला कळली नाही.
सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट होते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त झालेत. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल तेव्हा आरक्षण आणि सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल, हा यामागच्या प्रक्रियेचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.