मुंबई : प्रदूषणमुक्त पर्यावरण हवे असेल तर प्रत्येक वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचे आहे. अशातच अवैध PUC निर्मितीची साखळी पूर्णपणे बंद करण्यासाठी ‘नो PUC, नो फ्युएल’ उपक्रमाची कडक अंमलबजावणी पेट्रोल पंपांवर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव (परिवहन) राजेंद्र होळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, ‘प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांचा क्रमांक तपासला जाईल. यामुळे वाहनाचे PUC प्रमाणपत्र वैध आहे की नाही हे समजेल. जर प्रमाणपत्र वैध नसेल, तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही. मात्र, त्याच पेट्रोल पंपावर तात्काळ PUC काढण्याची सुविधा उपलब्ध करून वाहनचालकांची गैरसोय टाळली जाईल. प्रत्येक PUC ला युनिक आयडेंटिटी (UID) असेल, ज्यामुळे त्याची वैधता नियमित तपासता येईल.

भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम आणि वाहन दुरुस्ती गॅरेजमध्येही PUC देण्याची व्यवस्था केली जाईल. यामुळे रस्त्यावरील प्रत्येक वाहनाकडे वैध PUC असेल. यामुळे प्रदूषण कमी करण्यास फायदा होईल. तसेच, अवैध PUC जारी करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश होण्यास मदत होईल. असे सरनाईक यांनी म्हंटले आहे.

यासोबतच, परिवहन विभागाच्या कार्यालयांमध्ये आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा बसवणे आणि परिवहन भवनाच्या बांधकामासह इतर विषयांचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.







