बदलापूर : राज्यात दहीहंडी उत्सव आनंदात व उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु, बदलापूर शहरात झालेल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर यावर्षी शहरातील सर्व दहीहंड्याचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक जाणिवेच्या भावनेतून शहरातील दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती उत्सव आयोजकांनी दिली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहे. या घटनेमुळेच यंदा बदलापूरमध्ये कोठेही दहीहंडी साजरी केली जाणार नाही. बदलापूर शहरात काँग्रेस शहर अध्यक्ष संजय जाधव यांच्या माध्यमातून दरवर्षी ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची सर्वात मोठी दहीहंडी उभारली जात असते.
अजय राजा हॉल समोर उभारली जाणारी ही दहीहंडी यावर्षी रद्द करण्यात आली असून बदलापूर शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वप्रथम संजय जाधव यांनी दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर शहरातील सर्वच लहान मोठ्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कोणत्याच कार्यक्रमात डीजे वाजणार नाही..
आजचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय आयोजकांकडून घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे शहरातील साऊंड असोसिएशनने देखील यावर्षी कुठल्याही कार्यक्रमात डीजे न वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी बदलापूर शहर शांत पाहायला मिळत आहे. मात्र त्यातूनही बदलापूरकरांनी सामाजिक भान राखल्याचे बघायला मिळत आहे.