मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल हा शिंदेंच्या बाजूने लागणार असल्याची चर्चा सध्या आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. त्यांनी चक्क विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ करण्याची मागणी केली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी राहूल नार्वेकरांच्या ‘नार्को टेस्ट’ची मागणी केली आहे.
नितीन देशमुख यांच्या या मागणीला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलयं. आमदार संजय गायकवाड यांनी ‘ठाकरे गटाला निकाल लक्षात आलाय. त्यामुळे ते अकलेचे तारे तोडत आहेत’, असं प्रत्युत्तर दिलंय.
नितीन देशमुख म्हणाले होते की, निकाल आधीच ठरलेला आहे. भाजपनं सांगितला तसा विधानसभा अध्यक्ष देतील. जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल. आम्हाला निकालाची चिंता नाहीय. निकाल काहीही लागला तरी आमचा जनतेवर विश्वास आहे. त्याशिवाय, आम्ही आणखी ताकदीने जिल्ह्यातून आणि राज्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणत उद्धवसाहेबांचे हात मजबूत करू. निकाल देणारे नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटतात, यातच सारं आलं. आमचा देव असलेल्या बाळासाहेबांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे, असे नितीन देशमुख म्हणाले.
आमदार अपात्रता निकाल दोन दिवसांपूर्वीच ठरला असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. निकाल आमच्याविरोधात लागणार हे आत्ताच कळलंय, त्यामुळे आता निकालाबाबत उत्सुकता नाही. मला आत्ताच मंत्रालयात शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे असे दोन आमदार भेटले त्यांनी खात्रीपूर्वक सांगितलंय की, निकाल आमच्याविरोधात जाणार आहे. निकाल आमच्या विरोधात गेला तर पुन्हा न्यायालयात जाऊ, असे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले.