Coronavirus in India : देशात कोरोना व्हेरिएंट जेएन.१ ने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन.१ बद्दल सध्या नागरिकांमध्ये घबराटीच वातावरण निर्माण झाल आहे. २१ डिसेंबरपर्यंत देशभरात नवीन व्हेरिएंटची एकूण २२ प्रकरणं समोर आली आहेत. सर्व रुग्णांमध्ये याची सौम्य लक्षणे आढळून आल्याने ही बाब दिलासादायक ठरत आहे.
कोरोनांच्या वाढत्या रुग्णाची प्रकरणे लक्षात घेता अनेक नागरिक याला चौथी लाट मानत आहेत. मात्र, तज्ज्ञांचे मत पूर्णपणे भिन्न असून याला चौथी लाट म्हणता येणार नाही. दोन-तीन आठवड्यांत हे सर्व काही सामान्य स्तरावर येईल, तसेच JN.१ मुळे कोणतीही लाट येण्याची शक्यता नाही असे अनेक जाणकारांचे आणि तज्ज्ञांचे मत आहे.
नवीन व्हेरिएंटच्या रुग्णात सौम्य लक्षणे
कोरोना JN.1 च्या नवीन व्हेरिएंटने सगळ्यांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याचे ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून वर्गीकरण केले आहे. हा शेवटचा प्रकार नाही. भारतात JN.1 ची लागण झालेल्या रुग्णांमध्ये फक्त सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.
चौथी लाट म्हणता येणार नाही : डॉ. गौतम भन्साळी
मुंबई बॉम्बे हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले की, या आजारामध्ये सर्दी, खोकला, ताप यांचा समावेश असून परिणाम खूपच कमी असेल. मला वाटत नाही की या नवीन व्हेरिएंटने कोणतीही लाट येईल. मुंबईत नवीन व्हेरिएंटने दहा प्रकरणे आढळून आल्याची माहिती मिळाल्यावर थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे.
लस आणि बूस्टर डोसनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ओमिक्रॉन वेव्हने संपूर्ण जगाला त्रास दिला होता. पण सध्या परिस्थिती अशी आहे की मोठ्या संख्येने लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. त्यामुळे लाट येणार नसल्याची माहिती डॉ. गौतम भन्साळी यांनी दिली.