मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी नागपुरस्थित अश्मी रोड कॅरिअर प्रायव्हेट लिमिटेडची नवीन टोल वसुली एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. महामार्गाच्या – टोल वसुलीत पूर्वी नियुक्त केलेल्या कंपनीने अनियमितता दर्शवल्याने अखेरीस अष्टमी नावाच्या नागपूरमधील नव्या कंपनीची निवड तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महारागाच्या टोल वसुलीचे काम सुरळीत – होणार आहे.
एजन्सीने ११ ऑक्टोबर रोजी तीन महिन्यांच्या करारासाठी पदभार स्वीकारला. एमएसआरडीसीने पूर्वीच्या ऑपरेटर, रोडवेज सोल्युशन्स यांची डिसेंबर २०२२ पासून टोल वसुलीसाठी नियुक्ती केली होती. मात्र प्रवाशांच्या दुर्लक्षित सुविधा आणि पगार देयकांमध्ये वारंवार होणाऱ्या विलंबासह कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींमुळे एमएसआरडीसीलाही टीकेचा सामना करावा लागला. ग्राहक सुविधेतील त्रुटी आणि सेवेच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण आणि विविध टोल प्लाझावरील सुमारे २,८०० कर्मचाऱ्यांच्या तक्रारी डोईजड झाल्या होत्या.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रोडवेज सोल्युशन्सच्या अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून आणि इतर लोकांकडून बऱ्याच तक्रारी प्राप्त होत आहेत. कर्मचाऱ्यांनी अनियमित पगाराची तसेच त्यांच्या पीएफ आणि विमा प्रीमियमसाठी पैसे जमा करताना तफावत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. लोकांनी उद्घट वर्तनाबद्दल तक्रार केली. त्यामुळेच आम्ही सप्टेंबर महिन्यात एजन्सींना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून नव्या टोल वसुली कंपनीची निवड करण्यात आली असून ही निवड तीन महिन्यांसाठी करण्यात आली आहे.
एमएसआरडीसीने रोडवेज सोल्युशन्सचा करार संपुष्टात आणला असून आता अल्पकालीन व्यवस्थेअंतर्गत अश्मी रोड कॅरियर प्रायव्हेट लिमिटेड आणले आहे. टोल वसुली आता नवीन व्यवस्थापनाखाली असताना एमएसआरडीसी प्रवासी सुविधा आणि देखभालीवर देखरेख करणे सुरू ठेवेल, संक्रमणादरम्यान गुणवत्ता आणि कार्यक्षमतेत सुधारणांवर बारीक नजर ठेवणार आहे.