मुंबई: एसटीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असल्याने एसटीला उभारी देण्यासाठी सल्लागार नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उत्पन्नवाढीसाठी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या प्रयोगातून एसटी उभारी घेईल, असा सकारात्मक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
एसटीच्या पडीक मोकळ्या जागा विकसित करण्यासाठी व प्रवाशांच्या सेवेत अत्याधुनिक नवनवीन गाड्या सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार बांधकाम क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ सल्लागार व ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नेमण्यासाठी हालचाली सुरू असून, तसा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत येणार आहे.
हा निर्णय एसटीच्या दृष्टीने खरोखरच चांगला व आशादायी असला तरी, यापूर्वी एसटीने विविध प्रकल्पांकरिता नेमलेल्या सल्लागार कंपनीचा अनुभव पाहिला तर सदर कंपनीकडून अपेक्षित फायदा झालेला नाही. उलट या सल्ल्यासाठी करोडो रुपयांची रक्कम कंपनीला देण्यात आली आहे. त्यातून फारसे काही हाताला लागले नसल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.
हल्लीचे उदाहरण द्यायचे झाल्यास भाडेतत्त्वावरील १,३१० गाड्या घेण्याच्या निविदेत एका सल्लागार कंपनीकडून मार्गदर्शन घेण्यात आले होते. त्यात सपशेल अपयश आले. सदरची निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात आली. या कंपनीने पूर्वी दिलेल्या सल्ल्यातूनही महामंडळाला फायदा झाला नाही. दरम्यान, ३० वर्षांवरून ६० वर्षे लीज वाढवूनही विकासक मिळताना दिसत नाहीत. राज्यात. बहुतेक ठिकाणी तीच अवस्था असून, मोकळ्या जागांचा विकास टप्प्याटप्याने करण्यात येऊन त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळाले पाहिजे. याशिवाय ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नेमला जाणार असून, तो नेमला किंवा नेमला नाही तरी, त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही, अशी शक्यता बरगे यांनी व्यक्त केली.