मुंबई : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘अन्नपूर्णी’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, प्रदर्शनाच्या काही दिवसांमध्येच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या दृश्यांमधून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याच्या आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, चित्रपटाचा वाढता वाद पाहता, नेटफ्लिक्सने चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘अन्नपूर्णी’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, या चित्रपटाबाबतचा वाढता वाद पाहता, नेटफ्लिक्सने हा चित्रपट आता आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटवला आहे. दाक्षिणात्य चित्रपट तज्ज्ञ क्रिस्टोफर कनागराज यांनी याबाबतची माहिती दिली. “एक आठवड्यापूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘अन्नपूर्णी’ चित्रपट आता स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला आहे, असे सोशल मिडीयावर लिहित याबाबतची माहिती दिली.
काय आहे नेमका वाद?
भगवान राम मांसाहारी असल्याचा उल्लेख ‘अन्नपूर्णी’ चित्रपटात करण्यात आला आहे. चित्रपटात हिंदू पुजाऱ्याच्या मुलीला बिर्याणी बनवताना आणि नमाज पठण करताना दाखवण्यात आले आहे. तसेच यामध्ये लव्ह जिहादचे समर्थन करण्यात आले आहे. चित्रपटातील या दृश्यांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर चित्रपट निर्मात्यांसह अभिनेत्री नयनताराविरोधात मुंबई व जबलपूरमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
अन्नपूर्णी हा एक तमीळ चित्रपट आहे. या चित्रपटात नयनताराची मुख्य भूमिका आहे. नयताराबरोबर जय, सत्यराज, कार्तिक कुमार आणि रेणुका यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट एका महिला शेफच्या आयुष्यावर आधारित आहे.